अकोला शहरात २१ पर्यंत रात्री ‘संचार बंदी*’

 अकोला शहरात २१ पर्यंत रात्री ‘संचार बंदी*’


अकोला, दि.१८अकोला शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अकोला शहरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ जारी करण्यात आले असून दि.२१ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत सायंकाळी सात वा. ते सकाळी सहा वा. पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी आज निर्गमित केले.


यासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, दि.२१ रोजी पर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार दि. २१ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत सायंकाळी सात ते सकाळी सहा या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.


याकालावधीत आरोग्य सेवा, कोविड लसीकरण सत्र सुरु राहतील. तसेच या कालावधीत धार्मिक तेढ वाढविणारे, भावना भडकविणारे असे कृत्य. वक्तव्य, अफवा पसरविण्यास मज्जाव करण्यात आला आहे. समाज माध्यमांद्वारे असे संदेश प्रसारित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे रॅली, धरणे, मोर्चे व अन्य कार्यक्रमांचे आयोजन होणार नाही. निवडणूक प्रचार संबंधित कार्यक्रम असल्यास त्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे


विभागीय आयुक्तांनी घेतला लसीकरण मोहिमेचा आढावा*


*विशेष अभियानातील गती कायम राखण्याचे निर्देश*


अकोला, दि.१८ कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी १० तारखेपासून सुरु केलेल्या विशेष अभियानामुळे लसीकरणाची गती व प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हीच गती कायम राखून लसीकरणाचे काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज येथे दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज कोविड लसीकरणाबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो- पटोकार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले,डॉ. अस्मिता पाठक, डॉ. मनिष शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.


यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात लसीकरणासाठी पात्र लोकसंख्या (वय वर्षे १८ च्या वरील) १४ लक्ष ३३ हजार इतकी आहे. त्यापैकी ८ लक्ष ६८ हजार ८३९ लोकांनी (६०.६३ टक्के) प्रथम डोस घेतला आहे. तसेच ३ लाख ९७ हजार ९५० लोकांनी (२७.७७ टक्के) दुसरा डोस घेतला आहे. यादरम्यान एक नोव्हेंबर पासून लसीकरणाला गती आणण्यासाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली. एक नोव्हेंबर पासून आतापर्यंत (दि.१७) १९०२ सत्र आयोजित करण्यात आले. त्यात एक लाख ८ हजार ६०८ जणांना पहिला डोस तर ४० हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला असे एकूण १ लाख ४८ हजार ६०८ जणांचे लसीकरण करण्यात आले.


लसीकरणाला आलेली गती ही चांगली बाब असून हिच गती कायम ठेवावी. सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच याबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या जनजागृती उपक्रमांचेही विभागीय आयुक्तांनी प्रशंसा केली. लसीकरणासाठी आवश्यक मनुष्यबळ व लस साठा यांच्या उपलब्धतेबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव*

*प्रभावी उपक्रम राबवा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश*

अकोला, दि.18 भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. अमृत महोत्सवनिमित्त शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करुन प्रभावी उपक्रमाची   अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सर्व विभागांना दिले.

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाचे स्वरुप व अंमलबजावणी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या दालनात  आढावा घेण्यात आला. यावेळी उपआयुक्त पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे निलेश निकम, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, न.पा. प्रशासन अधिकारी सुप्रिया तोलारे, क्रीडा अधिकारी दिनकर उजवे, अधीक्षक मिरा पागोरे, जिल्हा उद्योग समन्वयक प्रसन्न रत्नपारखी आदी उपस्थित होते.

            आढावा बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सर्व विभागाने विविध उपक्रम राबवावे. याकरीता कृती आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल याची दक्षता घ्यावी. याकरीता प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी यांची नियुक्ती करुन त्याच्याव्दारे उपक्रम राबवावे. विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा दरमहा आढावा घेण्यात येईल. तसेच अमृत महोत्सव उपक्रमाची अंमलबजावणी करण्याकरीता आवश्यक निधीचा मागणीपत्र सादर करा, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

            भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षानिमित्त जिल्ह्यात एकता दौड, सायकल रॅली, संविधान दिनानिमित्त संविधान वाचन, वक्तृत्व  स्पर्धा, निबंधस्पर्धा, गायनस्पर्धा, बॅनर घडीपुस्तीका व कॉफी टेबलबुकव्दारे स्वातंत्र्यात सहभाग घेतलेल्या व्यक्तीची माहितीपुस्तीका, स्वच्छता व लसीकरण मोहिम अशा विविध उपक्रम प्रशासनाव्दारे राबविण्यात येणार आहे. यावेळी विविध विभागाव्दारे अमृत महोत्सवाबाबतचे सादरीकरण करुन माहिती दिली.


शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू*


अकोला, दि.18 सामाजिक न्याय विभागामार्फत अकोला येथील शासकीय वसतीगृहात प्र तज्ञवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वसतीगृहात प्रवेशाकरीता शुक्रवार दि. 26 नोव्हेंबरपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान बस्ती अकोला येथे प्रवेश अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्रीमती राठोड व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल डी.बी. बोथिंगे यांनी केले.


खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेकरीता*


*सोमवार दि.22 पर्यत अर्ज दाखल करा*


अकोला, दि.18 खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा फेब्रुवारी-2022 मध्ये हरियाणा येथे होणार आहे. खो-खो, कबड्डी व बॉस्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेकरीता सोमवार दि. 22 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज सादर करा, असे आवाहन जिल्हा‍ क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.


            खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत 21 खेळाचा समावेश असून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा निवड चाचणीकरीता बास्केटबॉल या खेळाकरीता 18 वर्षातील मुलींना मंगळवार दि. 23 नोव्हेंबर रोजी व खो-खो व कबड्डी खेळाकरीता मुलांनी बुधवार दि. 24 नोव्हेंबर रोजी स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे सकाळी नऊ वाजता उपस्थित रहावे.


            जिल्हास्तरीय कबड्डी व खोखो स्पर्धेतील विजयी संघ हा विभागस्तर स्पर्धेकरीता पात्र ठरेल व जिल्हा व विभागस्तरावरील हरलेल्या संघातील उत्कृष्ट खेळाडू व निवड चाचणीसाठी आलेल्या खेळाडूंमधील पाच खेळाडूंची निवड पुढीलस्तरावर निवड चाचणीकरीता करण्यात येईल. बास्केटबॉल मुलींच्या स्पर्धेतील विजयी संघ थेट राज्यस्तरावर प्रतिनिधीत्व करतील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. स्पर्धेकरीता होणारा खेळाडूंना प्रवास, भोजन व इतर खर्च स्वत: करावा लागेल.


 1 जानेवारी 2003 नंतर जन्मलेल्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता येईल. तसेच कबड्डी या खेळाकरीता मुले खेळाडूकरीता वजन 70 किलोच्या आत व मुलींकरीता 65 किलोच्या आत असणे आवश्यक आहे. शाळा किंवा क्लब यांचे संघ तसेच शाळा बाह्य संघात सहभागी न झालेले खेळाडू जिल्हास्तरावर निवड करीता उपस्थित राहु शकतील. स्पर्धाच्या निवड चाचणीकरीता खेळाडूंनी आधार कार्ड, दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट, जन्म दाखला आवश्यक कागदपत्रासह उपस्थित रहावे. स्पर्धेकरीता सहभागी होण्याकरीता संबंधित खेळाच्या संघानी सोमवार दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे अर्ज सादर करावा. उशीरा प्राप्त अर्जाचा स्पर्धेकरीता सहभागी होता येणार नाही.


कबड्डी स्पर्धेकरीता राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय खोकले व जिल्हा कबड्डीचे सचिव वासुदेवराव नेरकर, बास्केटबॉल स्पर्धेकरीता राज्य क्रीडा मार्गदर्शक लक्ष्मीशंकर यादव व जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव पुरण गंगतीरे, खो-खो स्पर्धेकरीता राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय खोकले व जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव अवधुत ढेरे यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता मोठया संख्येने खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले.

ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम घोषीत;*


*21 डिसेंबरला मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी*


अकोला, दि.18 राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानुसार 198 ग्रामपंचायतीच्या 398 रिक्त पदाकरीता मतदान मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी तर मतमोजणी बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.


            यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, पोटनिवडणूक कार्यक्रम याप्रमाणे : सोमवार दि. 22 नोव्हेंबर रोजी संबंधित तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे. मंगळवार दि. 30 नोव्हेंबर ते सोमवार दि. 6 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करणे. नामनिर्देशनपत्र छाननी मंगळवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक. गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे. मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करणे. बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील. सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध होईल. पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहिल, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे


.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने