भरधाव ट्रकने युवकास चिरडले
भरधाव ट्रकने युवकास चिरडलेअकोला : भरधाव ट्रकने समोरील दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात २६ वर्षीय युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावरील शेळद फाट्यावर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शेख नसीर शेख साबू कुरेशी. रा. आबाद नगर बाळापूर, असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास बाळापूर येथील मृतक शेख नासीर हा अकोलाकडे आपल्या एमएच ३० एस ८४६९ या दुचाकीने जात असताना अचानक पाठीमागून भरधाव येणाऱ्या एमएच ४६ ए आर ४९५२ या ट्रकने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यामुळे दुचाकी ट्रकच्या खाली आली. हा अपघात एवढा जबरदस्त होता की. दुचाकीवर असलेल्या या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच प्रवाशांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार बाळापूर महामार्ग मदत केन्द्राचे व बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीला खोळंबा निर्माण झाला होता.
_____________________________________________
शहरातील नवीन बस स्टँड क्रमांक 2 च्या पार्किंग मध्ये ठेवण्यात आलेल्या जुन्या सायकली, दुचाकी वाहन व इतर भंगार साहित्याला अचानक आग लागली, या आगीमुळे बस स्थानक परिसरात एकच धावपळ
शहरातील नवीन बस स्टँड क्रमांक 2 च्या पार्किंग मध्ये ठेवण्यात आलेल्या जुन्या सायकली, दुचाकी वाहन व इतर भंगार साहित्याला अचानक आग लागली, या आगीमुळे बस स्थानक परिसरात एकच धावपळअकोला : शहरातील नवीन बस स्टँड क्रमांक 2 च्या पार्किंग मध्ये ठेवण्यात आलेल्या जुन्या सायकली, दुचाकी वाहन व इतर भंगार साहित्याला अचानक आग लागली, या आगीमुळे बस स्थानक परिसरात एकच धावपळ उडाली. गेल्या कित्येक वर्षापासून नवीन बस स्थानक परिसराच्या पार्किंग मध्ये जुन्या जप्त केलेल्या दुचाकी, ऑटो रिक्षा, जुन्या सायकल इत्यादी भंगार साहित्य ठेवण्यात आले होते आज दुपारच्या सुमारास या ठिकाणी अचानक आग लागण्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे, या आगीमुळे बस स्थानक परिसरात सर्वत्र काळे धुर निर्माण झाले होते.
_____________________________________________
30 वर्षीय व्यक्ती बेपत्ता
30 वर्षीय व्यक्ती बेपत्ता मालेगाव: तालुक्यातील अमानी येथील 30 वर्षीय व्यक्ती 12 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. सदर युवक बेपत्ता होऊन बराच काळ होत असल्याने पोलिस तपास हा संथ गतीने होत आहे. तरी पोलिसांनी त्यांची शोध मोहीम हाती घ्यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून होत आहे.
अमानी येथील कुंडलिक उत्तम देशमुख (वय 30) हे मालेगाव येथे चहा व नाश्त्याचे हॉटेल चालवतात. 12 फेब्रुवारी रोजी दुपारी ते हॉटेलवर जातो, असे म्हणून घरून निघून गेले. दरम्यान, ते घरी परतले नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा परिसरात शोध घेणे सुरू केले. परंतु कुंडलिक देशमुख मालेगाव व परिसरात मिळून आले नाही. दरम्यान, याप्रकरणी ज्ञानबा जिजाबा देशमुख (रा. अमानी) यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कुंडलिक देशमुख हे हरविल्याची नोंद केली असून पोलिस तपास करीत आहेत. कुंडलिक देशमुख यांची उंची साडेपाच फूट आहे. त्यांनी अंगात निळ्या रंगाचा शर्ट व मेहंदी रंगाची पॅन्ट घातलेली आहे. वर्ण गोरा असून, दाढी वाढलेली आहे. ही व्यक्ती कुठेही आढळल्यास मालेगाव पोलिस स्टेशनला कळविण्यात यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बियाणी हे करीत आहेत.