मोठे नाल्याचे प्रहावामध्ये अडचण निर्माण करणारे आर.सी.सी.चे पाईप काढून नाला सफाई करण्यात आले
अकोला:-)दि.12जून2022रोजी अकोला महानगरपालिकेच्या पश्चिम क्षेत्रामधिल राष्ट्रीय महामार्ग क्रं. 6 पासून ते शिवसेना वसाहत कडे जाणा-या 125 फुट लांबी आणि 25 फुट रूंदीच्या मोठ्या नाल्यावर प्रा.डॉ.स्वर यांनी आर.सी.सी.चे पाईप टाकून आणि त्यावर माती व मलबा टाकून नाल्यातील जागा ताब्यात घेऊन नाल्याचा प्रवाह बाधित केला होता, यामुळे गंगा नगर आणि किरणा बाजार येथे पावसाचे पाणी साचले होते.
त्या अनुषंगाने आज दि. 12 जून रोजी मनपा आयुक्त कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये सदर नाल्यावर टाकण्यात आलेले आर.सी.सी.चे पाईप काढून नाला सफाई करण्यात आली. यावेळी पश्चिम झोन क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव, नगररचनाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र टापरे, आरोग्य निरीक्षक अमर खोडे आणि अतिक्रमण विभागातील कर्मचा-यांची उपस्थिती होती.
अकोला महानगरपालिका प्रशासना व्दारे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, अनावधानाने शहरातील काही नाले स्वच्छ करण्याचे राहिले असतील असे नाले स्वच्छ करणे बाबत संबंधित झोन कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा मनपाच्या amcakola.in या वेब साईट वर कळवावे. तसेच शहरामध्ये नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास मनपा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष फोन नं. 0724-2434460, 0724-2432102 आणि 0724-2432103 तसेच टोल फ्री क्रं. 18002335733 या नंबरांवर संपर्क साधावे. |
अकोला, -चि.सौ. कां. दुर्गा ही अशीच एक मुलगी. तिचे वडील भास्करराव तराळे रा. व्याळा ता. बाळापूर आणि आई प्रमिला ह्या दोघांचे छत्र हिरावले गेलेले. काळ कधीच कुणासाठी थांबत नसतो. मातापित्याचे छत्र असलेच म्हणजे मुलं मोठी होतात असे नव्हे, ती मोठी होतातच. अशीच दुर्गाही मोठी झाली. तिच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न यापूर्वीच झाले होते.
मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान हा बापाच्या आयुष्यातील कसोटीचा प्रसंग म्हणून नेहमीच वर्णिला जातो. नियतीने ज्या मुलींचे पितृछत्र हिरावून घेतले, त्या मुली ही वेदना अधिक जाणू शकतात. आज अशाच एका हळव्या प्रसंगात पालकमंत्री बच्चू कडू पहावयास मिळाले. एरवी आक्रमक, आंदोलक, निडर भासणारे पालकमंत्री याठिकाणी खूपच हळवे आणि भावूक भासत होते. मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान हे प्रसंग मुलीच्या बापाच्या जीवनात कसोटीचे असतात ते यासाठीच!
तिचे मेव्हणे व मामा ह्यांनी मिळून तिच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरु केले. कंचनपूर ता. खामगाव जि. बुलडाणा चे विलासराव बहुरुपी यांचे चिरंजीव प्रविण ह्यांच्या स्थळाचा होकार आला. आता लग्न समारंभ करुन देण्याचा प्रश्न आला. व्याळ्या जवळच हॉटेल मराठा चे संचालक मुरलीधर राऊत हे दरवर्षी अनाथ मुलींचे लग्न समारंभ त्यांच्यावतीने करुन देतात. तेथेच हा विवाह सोहळा करण्याचे ठरले. समारंभपूर्वक लग्न पार पडले.
पालकमंत्री बच्चू कडू यांनी कन्यादानाची जबाबदारी घेतली. त्यानुसार पालकमंत्री आले. वधुपित्याच्या आत्मियतेने सहभागी झाले. पुरोहितांनी सांगितले; त्याप्रमाणे विधीवत पूजा करुन जावई प्रविण आणि कन्या दुर्गा यांचे पूजन करुन दुर्गा ही कन्या जावई प्रविण ह्यांच्या सुपूर्द केली. व्याही विलासराव यांच्याकडून दुर्गाला नीट सांभाळण्याचे अभिवचन घेतले. पित्याच्या मायेने जावई आणि लेक यांना आहेर केला. शुभाशिर्वाद देऊन मगच पालकमंत्री सोहळ्यातून बाहेर पडले.
या विवाह सोहळ्यासाठी हॉटेल मराठाचे संचालक मुरलीधर राऊत, अमोल जमोदे, महेश आंबेकर, श्रीकांत धनोकार, अनिल गवई, पद्मजा मानकर, रमेश ठाकरे ही सेवाभावी मंडळी घरचं कार्य असल्याप्रमाणे सगळं हवं नको ते पहात होते.
==============================
===============================
थकित पाणीपट्टी कर आणि अवैध नळ जोडणी धारकांवर मनपा जलप्रदाय विभागाव्दारे कारवाई.
अकोला दि. 13 जून 2022 – मनपा आयुक्त यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील थकित पाणीपट्टी कर आणि अवैध नळ जोडणी धारकांवर मनपा जलप्रदाय विभागाव्दारे नळ जोडणी खंडीत करण्याची मोहीम सुरू असून आज दि. 13 जून रोजी मनपा पश्चिम झोन लोकमान्य नगर जलकुंभ अंतर्गत शिवसेना वसाहत येथील अंबिका चौक ला पाणी पुरवठा करणारी जुन्या पी.व्ही.सी. 4 इंची पाईप लाईन वर 23 अवैध नळ कनेक्शन आढळून आले, त्यामुळे सदर पाईप लाईन खंडीत करून बंद करण्यात आली आहे.
सदर कारवाई जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एच.जी.ताठे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून या कारवाईत जलप्रदाय विभागातील कनिष्ठ अभियंता तुषार टिकाईत शैलेश चोपडे, विभागीय फिटर श्री पद्माकर गवई, लोकमान्य नगर जलकुंभ चे व्हॉल्वमन सुधीर ढुके, संतोष पाचपोर, नागनाथ मोरे, धनराज पातोंड, गणेश घोडके कंत्राटदार पुरूषोत्तम गुंडवाले यांची उपस्थित होती.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील थकित पाणी पट्टी धारकांना तसेच अवैध नळ जोडणी धारकांना मनपा जलप्रदाय विभागाव्दारे आवाहन करण्यात येत आहे कि, त्यांनी थकित पाणी पट्टी कर भरून तसेच अवैध असलेली नळ जोडणी वैध करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच थकित पाणी पट्टी देयकाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास अकोला महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाशी संपर्क साधून देयके दुरूस्त करून थकित पाणी पट्टी कराचा भरणा वेळेवर करून नळ जोडणी खंडीत करणे सारख्या अप्रीय कार्यवाही टाळावी.
================================
जलशक्ती अभियानः केंद्रीय पथकाने घेतला आढावा;केली कामांची पाहणी
अकोला दि.13(जिमाका)- केंद्रपुरस्कृत ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ अंतर्गत विविध विभागाव्दारे करण्यात आलेल्या कामांचा आढावा आज केंद्रीय पथकाने घेतला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरणही करण्यात आले. जलशक्ती अभियानः कॅच दी रेन या अभियानाचा आढावा व पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आज केंद्रीय पथक दाखल झाले. केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालय विभाग नवी दिल्लीचे संचालक प्रशांत अग्रवाल व केंद्रीय जल, उर्जा व संशोधन संस्था पूणेचे वैज्ञानिक भुषण तायडे या दोन तज्ज्ञ सदस्यांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध विभागाव्दारे जलशक्ती अभियानाअंतर्गत केलेल्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, शिक्षणाधिकारी(प्राथ.) वैशाली ठग, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व अन्य विभागांचे विभाग प्रमुख व अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यात जलशक्ती अभियानातंर्गत झालेल्या कामाचे सादरीकरण केले. तसेच नव्याने होत असलेल्या कामांची माहिती दिली. लोकसहभागातून नदी, नाले व तलावातील गाळ काढण्यात आलेल्या कामाची माहिती व सादरीकरण करण्यात आले. तसेच जलशक्ती अभियानातंर्गत कॅच द रेन या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृती करण्यात येत असल्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शिवापूर, घुसर, अनकवाडी व आपोती बु. येथील नदी व नाल्याचे खोलीकरण केलेल्या कामाची पाहणी केली. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांची भेट घेतली. यावेळी कुलगूरु डॉ. विलास भाले यांनी कृषी विद्यापीठाविषयी व जलसंधारण संदर्भांत केलेल्या कामाची माहिती केंद्रीय पथकास दिली. कृषी विद्यापीठ अंतर्गत बाबुळगाव येथील तलावाची पाहणी केली. केंद्रीय पथकाचा तीन दिवसीय दौरा कार्यक्रम असून या दौरा कार्यक्रमा दरम्यान जलशक्ती अभियानातंर्गत विविध विभागाव्दारे केलेल्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी दिली.
==================================
एकमेकांना वृध्दत्वात सांभाळणारी जर्मनीतील टाइम बँक संकल्पना ....!
~~~~~~~~
वाचा ... वृध्दत्वात निश्चिंत ठेवणारी .... किती सुंदर ... किती उदात्त ...!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
जर्मनीमधे जॉब करीत असतांना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. त्या घराची मालकीण श्रीमती क्रित्सीना ही ६७ वर्षांची बाई शिक्षिका म्हणून ररिटायर्ड झाली. खरं म्हणजे तेथले पेन्शन इतकं मोठं असतं की तिला तिच्या उत्तरायुष्यात खायची, प्यायची काही ददात नव्हती. तरीसुध्दा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका ८७ वर्षांच्या महिलेची सेवा करण्याचे काम पत्करले काळजीवाहक म्हणून. मी तिला विचारले अधिक पैशाच्या मोहाने तू हे स्वीकारले आहेस कां? तर तिने दिलेले उत्तर मला संभ्रमीत करणारे होते. ती म्हणाली, नाही, मी पैशांसाठी नाही हे करीत. मी माझा हा कामाचा वेळ टाइमबँक मध्ये टाकते. आणि मी जेंव्हा म्हातारी होईन तेंव्हा मी ह्या टाईमबँकमधून मला सेवेचा वेळ काढून घेईन.
मला टाईमबँक असं काही असतं, हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. मी तिला विस्ताराने या संकल्पनेची माहिती विचारली. ती म्हणाली, स्वीसच्या शासनाने एक कल्याणकारी कार्यक्रम म्हणून याची सुरुवात केली. त्याचं असं आहे की जेंव्हा व्यक्ती सुद्रुढपणे तारुण्यात असते तेंव्हा ती आपल्यापेक्षा व्रुध्दाची सेवा करतात आणि ती जेंव्हा व्रुध्द होते तेंव्हा अशा सेवेची तिला आवश्यकता भासते. तेंव्हा अशा पूर्वी सेवा केलेल्या वेळेची परतफेड म्हणून तिला सेवा मिळते. अशी सेवेकरी व्यक्ती सुद्रुढ, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची असावी. ज्या व्रुध्दांनासेवेची अपेक्षा असते अशा अनेक संधी त्या तरुण व्यक्तीला मिळू शकतात. अशी त्यांची सेवेची वेळ त्यांच्या सेवा खात्यात जमा होते. सामाजिक कल्याण विभागाच्या. त्याच्यि घराची मालकीण आठवड्यातून दोन वेळा दोन दोन तास व्रुध्दांना त्यांच्या काही गोष्टी खरेदीसाठी किंवा त्यांच्या घरकामासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, वाचनासाठी अथवा बाहेर फिरण्यासाठी व्यतीत करीत होती. अशाप्रकारे एक वर्षापर्यंत सेवा दिल्यावर तिच्या सेवेची गणना करुन तिला टाइमबँक कार्ड दिलं जाईल. त्यात त्या सेवेची वेळ नमूद केलेली असेल. जेंव्हा सेवेकरी व्रुध्द होईल, तेंव्हा तिला तिच्यासाठी त्या टाइमबँक कार्डाव्दारे सेवा मिळू शकेल. तिच्या टाइमकार्डाची तपासणी होऊन टाइमबँक तिच्यासाठी सेवेकरी तिच्या घरी अथवा हाँस्पिटलमधे पाठवून देईल.
एके दिवशी मला माझ्या घरमालकीणीचा फोन आला. ती म्हणाली, काही गोष्टी काढण्यासाठी ती स्टुलावर उभी होती. तोल जाऊन ती पडली आणि तिच्या मांडीचे हाड मोडले आहे. मी आँफिसमधून रजा घेतली आणि तिला हाँस्पिटलमधे पोहोचवली. मी तिच्या सेवेसाठी रजा टाकत होतो. पण ती म्हणाली, तशी काही जरुरी नाही. मी माझ्या टाइमबँकेतून सेवेसाठी टाइम विड्राव्हल फाँर्म भरला आहे. आणि टाइमबँक आता माझी काळजी घेईल. आणि खरेच दोन तासात टाइमबँकेतून सेवेकरी हजर झाले. त्यानंतर महिनाभर त्या सेवा स्वयंसेविकेने माझ्या घर मालकिणीचे घर सांभाळले. तिच्यासाठी स्वयंपाक करुन जेवू घातले. तिच्याशी गप्पा मारुन आनंदी ठेवले. सेवेकरीच्या सहाय्याने घरमाकीण लवकरघ पूर्ण बरी झाली. बरी झाल्यावर लगेच ती आपल्या सेवाभावी कार्याला लागली. तिचे म्हणणे असे की, ती जोपर्यंत कार्यक्षम आहे तोपर्यंत ती जास्तीत जास्त वेळ टाइमबँक मध्ये टाकू इच्छिते.
सध्या स्वित्झर्लंडमध्ये टाइमबँकहा विषय अगदी सर्वमान्य झाला आहे. यामुळे शासनाला केवळ आर्थिक फायदाच नव्हे तर अनेक सामाजिक समस्या त्यामुळे मिटल्या आहेत. समाजामध्ये अधिक सामंजस्य व सहिष्णुततेची वाढ होण्यास मदत झाली आहे. बहुसंख्य स्वीस नागरिकांनी हा विषय उचलून धरला आहे. शासनाने केलेल्या पाहणीत लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात नागरिक या संकल्पनेत सहभागी होऊ इच्छीतात, हे दिसून आले आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये शासनाने अशाप्रकारचे कायदे करण्यात तत्परता दाखविली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या भारतातील सर्वात मोठ्या संघटनेचा दोन टर्म असण्याच्या पूर्वीपासून सक्षम ज्येष्ठांची अति ज्येष्ठांच्या सेवेसाठी काही वेळ देऊन हा विषय आपलासा करावा हा प्रयत्न अनेक श्रेष्ठींनी नागरिकांत प्रस्रुत करण्याचा प्रयत्न केला पण सर्व काही फक्त शासनानेचकरावे ही मनिषा असल्याने त्या विषयावर बहुसंख्यांनी पाठ फिरवली. आपणही पुढे व्रुध्द होणार आहोत आणि सध्या न्यूक्लीअर कुटुंबाची प्रथा मूळ धरु पहात असल्याने आपल्या व्रुध्दत्वी काळजीवाहक म्हणून आपल्याला कोणी साथी उपलब्ध होऊ वकेल ह्या भावनेने आजच्या तरुणाईने व्रुध्दांशी सेवाभाव ठेवावा हा विचार केल्यास भारतीय व्रुध्दांचे भवितव्य उज्वल असेल.
बघा विचार करुन
===================================
मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश
अकोला, ता.१३- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे चालविले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह अकोला येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु झाले आहे. शालेय विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तरी अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील तसेच अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे. संपर्कासाठी पत्ताः- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान वस्ती, अकोला.
==============================
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटिस भरती मेळावा
232 जणांचा सहभाग;178 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड
अकोला, ता.१३(जिमाका)-कौशल्य विकास व उद्योजकता विभाग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथे आज मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटीसशीप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात एकूण 232 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात एकूण 178 प्रशिक्षणार्थींची प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, या मेळाव्यात बडवे इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, युवा शक्ती फाउंडेशन पुणे, डिजीटल वर्ल्ड एज्युकेशन अकोला, प्रधानमंत्री कौशल केंद्र अकोला, जम्बो मार्ट प्रायव्हेट लिमिटेड अकोला या आस्थापनांनी सहभाग घेतला. मुलाखतीनंतर युवाशक्ती फाऊंडेशन पुणे यांनी जवळपास 90 कंपन्यांसाठी 48 प्रशिक्षणार्थांची प्राथमिक स्वरूपात निवड केली. टिमप्लस एच आर.यांनी 11 कंपन्यांसाठी 40 प्रशिक्षणार्थांची निवड केली. बडवे इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांनी 90 उमेदवारांची प्राथमिक स्वरूपात निवड केलेली आहे. राष्ट्रीय अप्रेंटीसशीप मेळाव्याचे आयोजन दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी करण्यात येते, अशी माहिती प्राचार्य पी.एन. जयस्वाल यांनी दिली. या मेळाव्यासाठी उपप्राचार्य एस.आर.ठोकरे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. बी.घोंगडे, तसेच गटनिदेशक, शिल्पनिदेशक एस. एम.पिसे, एस.पी वानखेडे. उज्वल राठोड यांनी परिश्रम घेतले.
.jpeg)

