सत्य लढा न्यूज महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी आताच नाव नोंदणी करावी-राज्य निवडणूक आयुक्त.

 मुंबई,(रानिआ): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीही मतदानापासून किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये म्हणून भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नावे नोंदवावित किंवा आवश्यक त्या दुरूस्त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.


            श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदार संघांच्याच मतदार याद्या महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशाच्या तशा वापरल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावांत किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कुठलीच कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. त्यामुळे विधानसभेच्या मतदार यादीत नाव नसल्यास नावांची नोंदणी करणे, दुबार नावे वगळणे किंवा नावांतील अथवा पत्यांमधील दुरूस्त्या करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ही एक चांगली संधी आहे.


            मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी 1 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी 1 जानेवारी 2022 हा अर्हता दिनांक आहे. म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती आता मतदार म्हणून आपले नाव नोंदवू शकते. मतदार नोंदणीसाठी फक्त निवासाचा आणि वयाचा दाखला; तसेच स्वत:चे छायाचित्र आवश्यक असते. राज्यात राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्यातून व समन्वयाद्वारे व्यापक प्रमाणावर मदतार नोंदणी मोहीम राबविली जात आहे, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.


मतदार नोंदणी (संक्षिप्त पुनरीक्षण) कार्यक्रम


·       प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी: 1 नोव्हेंबर 2021


·       प्रारूप मतदार याद्यांवर दावे व हरकती दाखल करणे: 30 नोव्हेंबर 2021


·       दावे व हरकती निकाली काढणे: 20 डिसेंबर 2021 पर्यंत


·       अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी: 5 जानेवारी 2022


आपण हे करू शकतो


·       विधानसभेच्या प्रारूप मतदार यादीतून आपल्या नावाची खात्री करणे


·       1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती नाव नोंदवू शकते


·       आपल्या संबंधित मतदार याद्यांतील दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील


·       आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील


·       एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाला असल्यास पत्यात बदल करावा


·       आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीचे नाव वगळावे


·       नाव नोंदविल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करू शकाल


नाव नोंदणी कुठे कराल? 


·       ऑनलाईन नाव नोंदणीसाठी- www.nvsp.in


·       छापील अर्जाद्वारे नाव नोंदणी- मतदान केंद्र किंवा अन्य निर्देशित ठिकाणे


नाव नोंदणीसाठीच्या अर्जाचे नमुने


·       प्रथम नाव नोंदणीसाठी किंवा दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर केले असल्यास: अर्ज क्र. 6


·       अनिवासी मतदाराचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी: अर्ज क्र. 6अ


·       इतर नावाबाबत आक्षेपासाठी, स्वत:चे किंवा मृत व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी: अर्ज क्र. 7


·       मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरूस्त्या करण्यासाठी: अर्ज क्र. 8


·       एकाच मतदारसंघातील निवासाचे ठिकाण बदलले असल्यास: अर्ज क्र. 8अ


निवासाचा दाखला (कोणताही एक)


·       जन्म दाखला


·       भारतीय पारपत्र


·       वाहन चालक परवाना


·       बँक/ किसान/ पोस्ट पासबूक


·       सिधावाटप पत्रिका


·       प्राप्तिकर निर्देशपत्रिका


·       पाणी/ दूरध्वनी/ वीज/ गॅस देयक


·       टपाल खात्याद्वारे प्राप्त टपाल/ पत्र


वयाचा दाखला (कोणताही एक)


·       भारतीय पारपत्र


·       वाहन चालक परवाना


·       पॅन कार्ड


·       शाळा सोडल्याचा दाखला


·       12 वी, 10 वी, 8 वी किंवा 5 वीची गुणपत्रिका


·       आधार कार्ड


·       21 वयोगटावरील प्रथमच नोंदणी करणाऱ्यांसाठी जोडपत्र-3


ऑनलाईन नाव नोंदणीसाठी


·       कागदपत्रे व छायाचित्र दोन एमबीच्या आत असावेत


·       कागदपत्रांची व छायाचित्राची फाईल JPG/ JPEG असावी.

_____________________________________________

तूर पिकावरील मारुका अळीचे व्यवस्थापन*

अकोला,दि.८ मागील पंधरवाड्यातील पावसाळी वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान हे तूर पिकावरील मारुका अळीच्या वाढीस पोषक आहे व अशा वातावरणामुळे तूर पिकाला मारुका अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे, असे कृषी संचालक(विस्तार व प्रशिक्षण) ,कृषी आयुक्तालय, पुणे यांनी कळविले आहे.


                सद्यस्थितीत तूर पिकावर काही ठिकाणी ‘मारुका’ या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर्षी चांगला पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पीक चांगले आहे व हे पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. शेतकरी बंधूंना तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मारुका या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.


मारुका अळी-


मारुका (Maruca vetrata) ही कडधान्य पिकावरील पाने गुंडाळणारी व शेंगा पोखरणारी कीड आहे. या किडीचा पतंग करडया रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे आढळून येतात. मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या असतात. अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळ्याने चिटकून झुपके तयार करून त्या आतमध्ये राहून कळ्या, फुले खाते. तिस-या व चौथ्या अवस्थेतील अळी शेंगा पोखरून आतील दाणे खाते. अळी शेंगांच्या झुपक्यात किंवा माती मध्ये कोषावस्थेत जाते. या किडीचा जीवनक्रम १८ ते  ३५ दिवसात पूर्ण होतो.


मारुका अळी व्यवस्थापनः-


किडीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात २० ते २५ ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास गरजेनुसार खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकची फवारणी करावी.


१. फ्लूबेंडामाइड २० डब्ल्यूजी ६ ग्रॅम किंवा


२. थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू.पी २० ग्रॅम किंवा


३. नोवलुरोन ५.२५  इंडोक्झाकार्ब ४.५० एससी १६ मिली


              वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसरऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्र तिप्पट करावी. गरज भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये. किटकनाशकांच्या शिफारशी ह्या तदर्थ स्वरुपाच्या असून शेतकरी बंधूंना तात्काळ नियंत्रणाच्या दृष्टीने प्रसारित करण्यात येत आहेत.


महत्त्वाची सुचनाः-


शेतकरी बंधूंनी फवारणी करते वेळी संरक्षक किटचा वापर करावा,असे आवाहनही करण्यात आले आहे.                                   (तांत्रिक माहिती व सहकार्य : डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला )

_____________________________________________

अकोला,दि.८ जिल्‍हा काम वाटप समिती ची बैठक मंगळवार दि. ९ रोजी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक  काही कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे,असे सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी कळविले आहे.


यानिमित्ताने,सर्व सुशिक्षित बेरोजगार सहकारी सेवा संस्‍थाना कळविण्‍यांत येत आहे की, प्रस्‍ताव स्विकारणे सुरु असल्‍याने आपण काम करण्‍यास इच्‍छूक असल्‍यास व काम वाटप समितीच्‍या शर्थी व अटीस पात्र असल्‍यास आपला प्रस्‍ताव प्राथमिक छाननी करीता जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, अकोला या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा, तसेच ज्‍या सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्‍थानी या अगोदर प्रस्‍ताव सादर केलेला असेल त्‍यांचा प्रस्‍ताव पात्र असल्‍यास ग्राह्य धरण्‍यात येईल याची नोंद घ्‍यावी,असे सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने