विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१ मतमोजणी प्रक्रिया पूर्ण; वसंत खंडेलवाल विजयी घोषित.

 *विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१*

*मतमोजणी प्रक्रिया पूर्ण; वसंत खंडेलवाल विजयी घोषित*


अकोला,दि.१४अकोला-बुलडाणा-वाशिम विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूकीची आज मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. त्यात भारतीय जनता पार्टीचे वसंत खंडेलवाल विजयी झाल्याचे  निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी घोषित केले. वसंत खंडेलवाल यांना ४४३ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली.


आज सकाळी आठ वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील धान्य गोडाऊन मध्ये मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक असलेले माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे हे ही उपस्थित होते. मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे पार पाडण्यात आली.  मतमोजणीसाठी पाच टेबलची रचना करण्यात आली होती. त्यावर मतमोजणी करण्यात आली.


अंतिमतः मिळालेल्या मतांचा तपशिल या प्रमाणे- गोपीकिशन राधाकिसन बाजोरिया यांना ३३४ मते , वसंत मदनलाल खंडेलवाल यांना ४४३ मते,  एकूण वैध मते ७७७, अवैध मतांची संख्या ३१.


मतमोजणी नंतर निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर  वसंत मदनलाल खंडेलवाल हे विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केली. त्यानंतर वसंत खंडेलवाल यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत पार पडली. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी  सहा. निवडणूक निर्णय अधिकारी  तथा निवासी उपजिल्हाधिकारी अकोला संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी बुलडाणा दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम शैलेश हिंगे तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण,  उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, प्रांताधिकारी बाळापूर रामेश्वर पुरी, मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते पाटील, अकोला डॉ. निलेश अपार, अकोट श्रीकांत देशपांडे तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.






_____________________________________________

*मनपा उपायुक्‍त डॉ.जावळे यांनी घेतली स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण - 2022 च्‍या अनुषंगाने प्रशिक्षण व आढावा बैठक.*   


अकोला दि. 14 अकोला महानगरपालिकेच्‍या  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह येथे मनपा उपायुक्‍त डॉ.पंकज जावळे यांच्‍या व्‍दारे स्‍वच्‍छ भारत अभियान अंतर्गत स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण 2022 टूलकिट  बाबत कार्यशाळा व आढावा बैठक घेण्‍यात आली. या बैठकीमध्‍ये मनपा उपायुक्‍त डॉ.जावळे यांनी सर्वप्रथम स्‍वच्‍छ भारत मिशन अंतर्गत करण्‍यात आलेल्‍या  कामांचा आढावा घेतला. आणि स्‍वच्‍छते बाबतचा शहरामध्‍ये करण्‍यात येणा-या उपाययोजनांबाबत माहिती देण्‍यात आली आहे. तसेच कचरा घंटा गाडीव्‍दारा शहरातील प्रत्‍येक घरापासून कचरा संकलन झाला पाहिजे याकडे विशेष लक्ष घालणे, प्रभागांमध्‍ये दिवसातून एक वेळा सफाईचे काम आणि वाणिज्‍या क्षेत्रांमध्‍ये  सकाळी आणि रात्रीच्‍या वेळी दोनदा सफाई झाली पाहिजे याचा नियोजन करणे, घरातून किंवा प्रतिष्‍ठानातून निघणारा ओला, सुका आणि घातक कचरा वेग-वेगळा गोळा करणे संर्भात सर्व आरोग्‍य निरीक्षकांनी याबाबत आप-आपल्‍या कार्यक्षेत्रांमध्‍ये जनजागृती करून त्‍या प्रमाणे कचरा संकलन करणे, शहरामध्‍ये विविध ठिकाणी कच-याचे ढिग यावर पुर्णतः बंदी घालून परिसरात कचरा पसरविणा-यांवर दंडात्‍मक कारवाई करणे, शहरामध्‍ये स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण- 2020 च्‍या अनुषंगाने जनजागृति करणे, तसेच शहरातील नागरिकांना आपल्‍या परिसरातील स्‍वच्‍छते बाबतच्‍या तक्रारींचा निपटारा करण्‍यासाठी स्‍वच्‍छता अॅप डाउनलोड करणे बाबत जनजागृती करणे आदिंबाबत सुचना करण्‍यात आल्‍या.   


 या बैठकीमध्‍ये आरोग्‍य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, विठ्ठल देवकते, स्‍वच्‍छ भारत मिशनचे शहर समन्‍वयक अफाक शरीफ सैय्यद तसेच सर्व आरोग्‍य निरीक्षक यांची उपस्थिती होती.


______________________________________________

*पतंग उत्सव साजरा करतांना पक्षांची*

*काळजी घ्या- जिल्हाधिकारी निमा अरोरा*

*जखमी पक्षांच्या सुश्रुषेसाठी ‘सेव्ह बर्डस अकोला’ संस्थेचा पुढाकार*


अकोला, दि.१४ मकर संक्रांतीस पतंग उत्सव साजरा करतांना  आकाशात उडणाऱ्या पक्षांची काळजी घ्या,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. पतंगोत्सवा दरम्यान अथवा एरवीही जखमी पक्षी आढळल्यास अशा पक्षांना  सेव्ह बर्डस अकोला या संस्थेकडे सुश्रुषा व उपचारासाठी सुपूर्द करावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.


यासंदर्भात जिन आज्ञा ग्रुप या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेतली. मकर संक्रांतीच्या पार्श्वभुमिवर  प्रतिबंधित असणाऱ्या नायलॉन मांजा विक्री व वापरास मनाई असून त्यामुळे माणसांना व आकाशात विहारणाऱ्या पक्षांना  गंभीर इजा होऊन नुकसान होते. शिवाय अनेक पक्षांना प्राणास मुकावे लागते. तथापि, पतंग उडविण्याच्या मकर संक्रांतीच्या पर्वात पक्षांच्या जखमी होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच माणसांनाही नायलॉन मांजाच्या वापरामुळे गंभीर दुखापत होत असल्याच्या घटना घडत असतात. नायलॉन मांजामुळे पतंग उडवितांना आकाशात विहरणारे पक्षी तसेच  तुटलेल्या पतंगासोबत लटकलेल्या मांजामध्ये अडकूनही अनेक पक्षी जायबंदी होत असतात. अशा जखमी पक्षांना ‘सेव्ह बर्डस अकोला’ या संस्थेचे कार्यकर्ते उपचार करतात. त्यासाठी त्यांचा हेल्पलाईक क्रमांक ७२४९४५९६६६ असा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने