*जागतिक अपंग दिनी वृक्षारोपण* *सामाजीक कार्यकर्ते सुनिल गोहर यांचा उपक्रम*.

अकोला - जागतिक अपंग दिनी अनेक अपंग नागरिकांना सोबत घेवून वनमित्र तथा सामाजीक कार्यकर्ते सुनिल गोहर यांनी शहरातील विविध भागात वृक्षारोपण करुन हा अपंग दिन साजरा केला. 

आज 3 डिसें. रोजी शहरातील विविध भागात अपंग दिनी वृक्षारोपण केल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक होत असून या उपक्रमात महिला व अनेक अपंगांनी आपला उत्साह दाखवून वृक्षारोपण केले. या आगळ्या वेगळ्या उपक्रमात वनमित्र सुनिल गोहरसह मोईन अली खान, ललीतसेठ भगत, जयसागर जैन, यश गोहर, महेश टावरी यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती होती.




_____________________________________________

*90 टक्के पेक्षा जास्त लसीकरण केलेल्या ग्रामपंचायतींना मिळणार विशेष पुरस्कार*

अकोला,दि.3 कोविड-19 च्या विषाणुला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण प्रभावी माध्यम आहे. नागरीकांनी लसीकरण करावे याकरीता प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजनाअंतर्गत ग्रामीणस्तरावर लसीकरणाला गती देण्याकरीता जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाव्दारे ग्रामपंचायतींसाठी प्रोत्साहनपर योजना राबविली जात आहे. त्यानुसार  रविवार दि. 10 डिसेंबरपर्यंत नागरिकांचे 90 टक्के पेक्षा जास्त लसीकरण करुन घेणाऱ्या ग्रामपंचायतीना विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.


रविवार दि. 10 डिसेंबरपर्यंत 90 टक्के पेक्षा जास्त लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतीचा सन्मान पत्र देवुन सन्मान करण्यात येईल. तसेच तालुकास्तरावर 90 पेक्षा जास्त लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायती मधुन लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीना विशेष पुरस्कार देण्यात येतील. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मधुन 90 पेक्षा जास्त लसीकरण करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपचायंतीमधुन लकी ड्रॉ पद्धतीने तीन ग्रामपंचायतीना जिल्हास्तरावरुन विशेष पुरस्कार व सन्मानपत्र देण्यात येईल.


 स्पर्धेत विजेता ग्रामपंचायतीना सर्व पुरस्कार जिल्हा परीषद व जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या भागातील नागरीकांनी पहिला डोस पुर्ण करणे व देय असलेल्या दुसऱ्या डोसबाबत नागरीकांना प्रेरीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. तसेच आपल्या गावातील नागरीकांनी जास्तीत जास्त लसीकरण करुन या मोहिमेमध्ये सहभाग घेण्याबाबत आवाहन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

_____________________________________________

*अकोला महानगरपालिका समग्र शिक्षा अंतर्गत 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने समता सप्ताहास उत्‍साहात सुरुवात.*


 अकोला दि. 03 जागतिक दिव्यांग दिन अनुषंगाने समता सप्ताहानिमित्ताने समग्र शिक्षा महानगरपालिका अकोला, येथे विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धेचे आयोजन करून या दिनाचा शुभारंभ करण्यात आला. covid-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करून मुलांनी विविध स्पर्धेमध्ये उत्साहाने भाग घेतला. आजच्या दिवशीच्या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने वन मिनिट शो अंतर्गत फुगे फुगविणे तसेच समान वयोगटानुसार संगीत खुर्ची, लिंबू चमचा या खेळांचा समावेश करण्यात आला होता. आजच्या या उद्घाटकीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महानगरपालिका शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुलताना या उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून समग्र शिक्षाचे प्रशासन अधिकारी श्री प्रदीप चोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समावेशित शिक्षणाच्या विशेष तज्ञ श्रीमती कविता शर्मा यांनी केले.


            कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून विषयतज्ञ श्री अविनाश फुटाणे, श्री मोहसीन अख्तर तर पालकांचे प्रतिनिधी म्हणून श्री शेख कलीम व श्रीमती काचन बोंद्रे हे होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणांमध्ये शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुलताना यांनी पालकांना, 'मुलांप्रति सकारात्मक दृष्टिकोन ठेवत त्यांच्यामध्ये जी गोष्ट चांगली आहे, त्यावर लक्ष देऊन त्याला पुढे जाण्यामध्ये प्रेरणा द्यावी'  असे आवाहन केले. समग्र शिक्षा च्या समावेशित टीमच्या कार्याचे अभिनंदन करतांना, त्यांनी समाजातील व पालकांमधील दुवा म्हणून सातत्याने काम करावे, असे प्रबलन देत कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समग्र शिक्षा च्या विषयतज्ञ वैशाली शेंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विशेष शिक्षक श्री सुप्रीत निंबाळकर यांनी केले.


आजच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा खाऊवाटप श्री अविनाश फुटाणे यांच्या कडून करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष शिक्षक गंगाधर शिंदे, श्री उमेश सोनवणे, श्री जयेश अंजीकर, श्रीमती भावना कांबळे यांच्यासह विषय तज्ञांमध्ये श्रीमती लीना रामटेके, श्रीमती भाग्यश्री कडू, श्रीमती वैशाली पाचकवडे त्याचप्रमाणे डाटा एंट्री ऑपरेटर श्री संदीप राऊत यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकोला समग्र शिक्षाचे अजहर भाई यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.


_____________________________________________

*डाक अदालत बुधवारी(दि.१५)*



 अकोला,दि.३  डाक सेवेबाबत तक्रार सहा आठवड्यापेक्षा जास्त काळ अनुत्तरीत असेल अशा तक्रारींने निवारण करण्यासाठी  बुधवार‍ दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालय, अकोला विभाग, सिव्हिल लाईन अकोला येथे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या डाक अदालतीस तक्रारदाराने स्वत:च्या खर्चाने उपस्थित रहावे. सोबत अनुत्तरीत तक्रारीबाबतचा अर्ज व त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत ज्या अधिकाऱ्याकडे दाखल केली आहे त्यांचा हुद्दा, व दाखल केल्याची तारीख, एका अर्जासोबत एकच तक्रार असावी. आपली तक्रार प्रवर अधिक्षक, अकोला यांच्याकडे शुक्रवार दि. १० पुर्वी समक्ष अथवा पोस्टाने पाठवावी, असे आवाहन डाक कार्यालयाचे प्रवर अधिक्षक,अकोला यांनी केले.

_____________________________________________

*विशेष लेखः- भूतदया आणि प्राणी संरक्षणाचे कायदे*


 जीवोजिवस्य जीवनम, हे जरी खरे असले, तरी मानवी समूहाने आपले सहचर म्हणून सर्व प्राणीमात्रांशी आपला व्यवहार राखायला हवा. शेती वा तत्सम विविध उपयोगांसाठी प्राण्यांचे पालन करतांना त्यांच्या स्वाभाविक अधिवास व अन्नसाखळीचा भंग करता कामा नये. तसेच प्राण्यांना क्रूरतेने न वागवता त्यांच्याशी  प्रेमळ व्यवहार ठेवला पाहिजे. भूतदया हा  मानवाचा स्थायी भाव आहे. अनेक महापुरुष विद्वानांनी याबाबत सांगून ठेवले आहे.


तथापि, समाजात प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याच्या घटना घडत असतात. त्यांना आळा घालावा, तसेच प्राण्यांचे नैसर्गिक हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी  आपल्या देशात अनेक कायदे करण्यात आले असून त्याद्वारे प्राण्यांचे रक्षण त्यांच्या अधिवासाचे रक्षण आणि  जीव म्हणून त्यांच्या अधिकारांचे रक्षण अधोरेखित करण्यात आले आहेत.


 


 प्राणी संरक्षण तसेच प्राण्यांशी निर्दयतेने वागण्यास प्रतिबंध करण्यासाठी विविध कायदे-


 


केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनयम, १९६० मधील तरतूदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्राणी क्लेष प्रतिबंधक (प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी स्थापना व नियमन) नियम, २००१ मधील नियम (३) च्या उपनियम (१) अन्वये, दिनांक १४ मार्च २०१७ च्या अ्धिसूचनेद्वारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये

प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार, सोसायटी नोंदणी अधिनियम, १८६०अंतर्गत अकोला जिल्हा SPCA (Society for  The Prevention Of Cruelty to Animals) ची नोंदणी करण्यात आली आहे. यानुसार, अकोला जिल्हा SPCA   ही संस्था  शासन, महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, भारतीय जिवजंतू कल्याण मंडळ तसेच स्थानिक प्राधिकरण यांचेशी समन्वय साधून कार्य करत आहे.


 


सर्व प्राणी प्रेमीं, पशू पालक तसेच सामान्य नागरिक यांनी या अधिनियमांची जाणीव ठेवली पाहिजे:


 या कायद्यातील तरतूदीनुसार,


सर्व प्राणिमात्रांबद्दल सहानुभूती आणि करुणा बाळगणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे प्रथम आणि मूलभूत कर्तव्य आहे.


सर्व सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. कलम ५१ अ(ग).


भटक्या प्राण्यांसह कोणत्याही प्राण्याला मारणे किंवा अपंग करणे हा दंडनीय गुन्हा आहे. भादंवि कलम ४२८ आणि ४२९.


कोणत्याही कारणास्तव एखाद्या प्राण्याला सोडून दिल्यास, असे करणाऱ्या व्यक्तीस तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद कलम ११(१)(इ) आणि कलम ११(१)(ह) प्राणी संरक्षण अधिनियम १९६० अन्वये करण्यात आली आहे.


कत्तलखान्याशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्राण्याची (कोंबडीसह) कत्तल करता येणार नाही. आजारी किंवा गाभण जनावरांची कत्तल करू नये. नियम ३, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध, (कत्तलखाना) नियम, २००१ आणि प्रकरण ४, अन्न सुरक्षा आणि मानक नियम, २०११.


जन्म नियंत्रणासाठी शस्त्रक्रिया केलेल्या भटक्या कुत्र्यांना कोणत्याही प्राधिकरणासह कोणीही पकडू किंवा स्थलांतरित करू शकत नाही. प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम, २००१.


एखाद्या प्राण्याला पुरेसे अन्न, पाणी, निवारा आणि व्यायाम नाकारून किंवा त्याला जास्त तास साखळदंडाने/बंदीस्त ठेवून दुर्लक्ष केल्यास दंड किंवा तीन  महिन्यांपर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षा यांची तरतूद करण्यात आली आहे. प्राणी संरक्षण अधिनियम १९६०.


वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ अंतर्गत माकडांना संरक्षण दिले जाते आणि ते प्रदर्शित किंवा मालकीचे असू शकत नाहीत.


अस्वल, माकडे, वाघ, पँथर, सिंह आणि बैल यांना सर्कस किंवा रस्त्यावर प्रशिक्षित आणि मनोरंजनासाठी वापरण्यास मनाई आहे. कलम २२(२), प्राणी संरक्षण अधिनियम १९६०.


देशाच्या प्रत्येक भागात पशुबळी बेकायदेशीर आहे. नियम ३, कत्तलखाना नियम, २००१.


कोणत्याही प्राण्यांच्या लढाईचे आयोजन करणे किंवा त्यात सहभागी होणे किंवा भडकावणे हा दखलपात्र गुन्हा आहे. कलम ११(१)(म)(२) आणि कलम ११(१)(न), प्राणी संरक्षण अधिनियम १९६०.


प्राण्यांवर चाचणी केलेली सौंदर्यप्रसाधने आणि प्राण्यांवर चाचणी केलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या आयातीवर बंदी आहे. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियम, १९४५ चे नियम १४८-क आणि १३५-ब.


 कोणत्याही वन्य प्राण्याला पकडणे, विषबाधा करणे किंवा आमिष देणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे कायद्याने शिक्षेस पात्र असून या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपयांच्या रकमेपर्यंत दंड किंवा सात वर्षांपर्यंत शिक्षा किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद वन्यजीव (संरक्षण) कायदा, कलम ९, १९७२ अन्वये करण्यात आली आहे.


पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची अंडी किंवा घरटे विस्कळीत करणे किंवा नष्ट करणे किंवा अशा पक्ष्यांची आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची घरटी असलेल्या झाडाची तोड करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे ही शिकार बनते आणि २५ हजार रुपये दंड किंवा सात वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे.  वन्यजीव संरक्षण कायदा कलम ९, १९७२


कोणत्याही वाहनात किंवा त्यावरून, अस्वस्थता, वेदना किंवा त्रास देणाऱ्या कोणत्याही पद्धतीने किंवा स्थितीत प्राण्यांना नेणे किंवा नेणे हा दोन केंद्रीय कायद्यांनुसार दंडनीय गुन्हा आहे. कलम ११(१)(ड) प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंध, (प्राणी वाहतूक) नियम, २००१ आणि मोटार वाहन कायदा १९७८.


संदर्भः- प्राणी संरक्षण कायदे;वन्यजीव संरक्षण कायदे, १९७२


लेखन-कु. राखी वर्मा, प्राणी संरक्षण कार्यकर्ता, अकोला.

*कोविड लसीकरणासाठी आज(दि.4) सायकल रॅलीव्दारे जनजागृती*


अकोला - दि.3 भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरण मोहीमेची जनजागृती व्हावी, याकरीता आज (दि.4रोजी) सकाळी साडेसात वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीत जास्तीत जास्त संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.


सायकल रॅलीचा मार्ग याप्रमाणे : सकाळी साडेसात वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथून सायकल रॅलीचा शुभारंभ व मार्गस्थ होईल. त्यानंतर सरकारी बगीचा-जयहिंद चौक-छोटा पूल-सावताराम मिल रोड-मानिक टॉकीज-संतोषी माता चौक- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वसंत देसाई स्टेडियम येथे आगमन व सकाळी नऊ वाजता रॅलीचे समारोप होईल. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी व कार्यक्रमाचे संयोजक निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदि उपस्थिती राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने