कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना अनुदान; अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित*

 

कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना अनुदान; अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित*

अकोला :- कोविड १९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तिंच्या निकट नातेवाईकांना ५० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान  देण्यात येणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपत्ती व मदत पुनर्वसन विभागाने  शासन निर्णयही निर्गमित केला आहे. त्यानुसार शासनाने अर्जदारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन वेब पोर्टल विकसित केले आहे, त्यावर मयत व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकास कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करता येईल.त्या संकेतस्थळावर अर्जदारांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी  केले आहे.

*ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती-*

त्यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in  या संकेतस्थळावर लॉग ईन करणे आवश्यक आहे.  त्यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशिल जसे मृत्यू प्रमाण पत्र आणि रुग्णालयाचा तपशिल या कागदपत्राच्या आधारे त्याचा स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून सहाय्य मिळविण्यासाठी  लॉग ईन करता येईल. अर्ज सादर करण्याबाबत आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती mahacovid19relief.in वर  Document Required  या टॅब वर उपलब्ध आहे.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह सहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांनी कळविले आहे.


विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१:मतदान व मतमोजणी कालावधीत मद्यविक्री बंद*


 अकोला,दि.७ विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणूक खुल्या, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मतदान व मतमोजणी कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

बायोडिजेलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलची अवैध विक्री :अनधिकृत केंद्र चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश*

अकोला, दि.७ जिल्ह्यात अनेक ठिकाणी बायोडिजेल या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलची अवैध विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशाप्रकारे इंडस्ट्रियल ऑईल वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यास  शासनाची परवानगी नसून, असे अनधिकृत केंद्र चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, वाशिम अकोला पेट्रोलियम डिलर्स असोसीएशन अकोला यांनी निवेदन देऊन जिल्ह्यात अवैध बायोडिझेलची विक्री होत असल्याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार तहसिलदार, निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, निरीक्षक (वैधमापन) यांचे तालुकानिहाय पथक स्थापन करून काही बायोडिजेल विक्री केंद्राची तपासणी करण्यात आली व नमुन्यांची पडताळणी करून अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार, तपासण्यात आलेला नमुना बायोडिझेल नाही, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बायोडिझेल विक्री केंद्रावरून कोणतीही व्यक्ती वाहनांना थेट इंधन  म्हणुन बायोडिझेलची विक्री करता येणार नाही.

बायोडिझेल विक्री परवान्याकरिता १२ प्रकारचे परवाने व दाखले (ना हरकत प्रमाणपत्रे) आवश्यक आहेत.  ते याप्रमाणे- जिल्हा दंडाधिकारी/ जिल्हा आयुक्त यांचे प्रमापणपत्र , पेट्रोलियम विस्फोटक संघटना यांचा परवाना, राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाकडुन ना हरकत प्रमाणपत्र, जीएसटी रजिस्टेशन, वैधमापन विभागाचे प्रमाणपत्र , राज्य शासनाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र , दुकाने व आस्थापना विभागाचे नोंदणी पत्र , जमिनीचे वाणिज्यिक वापर संबंधी जिल्हाप्रशासनाकडुन मान्यता.

राज्यात बायोडिझेल विकीबाबत राज्याचे बायोडिझेल (उत्पादन ,साठवणुक पुरवठा व विक्री) धोरण २०२१ हे दि. ११ मे २०२१ रोजी शासनाने निश्चित केलेले आहे. या धोरणान्वये वरील १२ प्रकारचे दाखले- प्रमाणपत्र आवश्यक आहेत. त्याशिवाय बायोडिझेल ची विक्री करता येणार नाही असे, शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.

तसेच औद्योगिक वापराकरिता इंधन (Industrial Oil) असे फलक लावुन अवैध विक्री केंद्र सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे. तथापि,बायोडिझेल नावाखाली  इंडस्ट्रियल ऑईल (औद्योगिक उपकरणाकरिता उपयोगी असलेल्या उत्पादन)चा वाहनामध्ये उपयोग करू नये. इंडस्ट्रियल ऑईल हे कोणत्याही वाहनाकरिता इंधन म्हणुन वापर करण्यास शासनाची परवानगी नाही. त्यामुळे हे तेल वाहनाकरिता इंधन म्हणुन अधिकृत नाही,असे स्पष्ट करण्यात आले आहे.

            या संदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिलेल्या निर्देशानुसार, जिल्ह्यात कोणतीही व्यक्ती अनाधिकृत बायोडिझेल केंद्र चालवत असल्याचे आढळुन आल्यास तशी तक्रार संबंधित तहसिलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात येथे करावी. या तक्रारीच्या चौकशीअंती तथ्य आढळल्यास किंवा तसे निष्पन्न झाल्यास संबंधिताविरूध्द नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिले. बायोडिजेलची अवैध विक्री करतांना कोणतीही व्यक्ती आढळुन आल्यास अशा व्यक्ती विरुद्ध जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ , ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा असे निर्देशही जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले आहेत.मद्यविक्री बंद कालावधी खालीलप्रमाणे-


मतदान कालावधीत बुधवार दि.८ सायंकाळी चार ते शुक्रवार दि.१० सायंकाळी चार वाजेपर्यंत. तर मतमोजणीच्या दिवशी मंगळवार दि.१४ रोजी मतमोजणी संपेपर्यंत. या कालावधीत संपूर्ण अकोला जिल्ह्यात मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताची अनुज्ञप्ती तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


प्रधानमंत्री पीक विमा योजना:१५ डिसेंबर पूर्वी सहभागी होण्याचे आवाहन*


         अकोला,दि.७ प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम गहू, हरभरा व रब्बी कांदा पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे. तसेच भुईमुग या पिकाकरीता शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२२ आहे. गहू, हरभरा व कांदा या पिकांकरीता अंतीम दिनांक १५ डिसेंबर असल्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे.


यासंदर्भात कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार,अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवयाचा नसेल तर त्यांनी सहभागी न होणे बाबतचे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतीम मुदतीच्या सात दिवस अगोदर संबंधी बँकेस देणे आवश्यक आहे. योजनेत सहभाग नोंदविणेकरीता नजिकचे सीएससी केंद्र अथवा बँकेतून विमा काढता येईल.


            अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२१ अंमलबजावणी करीता खालील कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे.


एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. पहिला मजला, एचडीएफसी हाऊस १६५-१६६ एच.टी. पारेख मार्ग, चर्चगेट, मुंबई, दुरध्वनी क्रमांक ०२२-६२३४६२३४, ग्राहक सेवा क्र. १८००२६६०७०० ईमेल pmfby.maharashtra@hdfcergo.com,


एचडीएफसी अर्गो जिल्हा कार्यालय, एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. संस्कार अपार्टमेंट, महालक्ष्मी द्वार, रिंग रोड, अकोला, दुरध्वनी क्र. ८८२८००२४६०.


 एचडीएफसी अर्गो विमा कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी खालीलप्रमाणे-


जिल्हा व्यवस्थापक- सुनील भालेराव मो. नं. ८८२८००२४६०,


जिल्हा प्रतिनिधी- शुभम हरणे मो. नं. ८०८७९०३१७१,


अकोला तालुका प्रतिनिधी- अभिषेक रानडे मो. नं. ८२३७४६१०४०,


बार्शिटाकळी-नरेंद्र बहाकर मो. नं. ९७६६५५८५६१,


मुर्तिजापूर-सचिन जायले मो. नं. ८९८३०३६६४०,


अकोट-सुजय निपाने मो. नं. ७०५७५०२८७०,


तेल्हारा-सुशांत शेळके मो. नं. ८३२९११७१६३,


पातुर-धीरज कोहर मो. नं. ९५५२६२४९६,


बाळापूर-अमोल टाले मो. नं. ९७६६५८३२५६.


 


समाविष्ठ पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता खालीलप्रमाणे-


१)गहू- विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये प्रति हेक्टर. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता ५२५ रुपये., २)हरभरा- २४ हजार रुपये प्रति हेक्टर, ३६० रु.


३)रब्बी कांदा- ७३ हजार रुपये प्रति हेक्टर, ३६५० रु.


४)भुईमूग- ३८ हजार रुपये प्रति हेक्टर, ५७० रुपये.


            अधिसूचित पीक महसूल मंडळ व समाविष्ट तालुक्यांची संख्या:


गहू, हरभरा - सर्व तालुके - जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळे,


कांदा – बाळापूर, पातुर, मुर्तीजापूर, अकोला या तालुक्यामधील सर्व महसूल मंडळ,


भुईमुग – पातुर, बार्शीटाकळी, अकोला, तेल्हारा तालुक्यामधील सर्व महसूल मंडळ.


            तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत दिनांक १५ डिसेंबर २०२१ या अंतिम दिनांकापूर्वी सहभागी व्हावे. अधिक माहितीकरीता उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के.बी.खोत यांनी केले आहे.

*उदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिंजर येथे त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त*


 अकोला,दि.७ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला यांचे आदेशानुसार उदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिंजर र. नं. ४०१, या संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त होऊन संस्थेवर त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.


त्यामध्ये,


रोहीणी रा. विटणकर- सहाय्यक निबंधक,


सागर एन इंगळे, तालुका लेखापरीक्षक व


चेतन बी गोरेगावकर, उपमुख्याधिकारी, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक, यांचा समावेश आहे. प्रशासक मंडळाने संस्थेचा पदभार स्विकारलेला आहे. प्रशासक मंडळाने दि.१५/०९/२०२१ रोजी पदभार स्विकारलेला असल्याने संस्थेचा देणे- घेणे विषयक सर्व व्यवहार प्रशासक मंडळच करीत आहे. या संस्थेच्या सर्व सभासदांनी सर्व आर्थिक व्यवहारांसाठी प्रशासक मंडळ,व्दारा, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बार्शीटाकळी यांचे कार्यालय, आखाडे सदन, खडकपुरा चौक, बार्शीटाकळी या कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रशासक मंडळाशिवाय इतर कोणाशीही संस्थेशी संबंशित आर्थिक कर्जभरणा करणे इ. व्यवहार करू नये, असे आवाहन संस्थेच्या प्रशासक मंडळामार्फत करण्यात आले आहे. या उपरही प्रशासक मंडळाच्या कालावधीत इतरत्र संस्थेचे संबंधी आर्थिक व्यवहार केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही, असे प्रशासक मंडळ, उदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या.पिंजर यांनी कळविले आहे.

*स्वातंत्र्याचा अमृत: महोत्सव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी मुख कर्करोग आरोग्य शिबीर*


 अकोला,दि.७ भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या दंतशास्त्र व कान नाक घसा बाह्य रुग्ण विभागामध्ये दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी मुख कर्करोग आरोग्य शिबीर घेण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी कळविले आहे.


 विविध व्यसने व धावपळीच्या दिनचर्येमुळे मौखिक आजार मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत आहेत. त्यात मुख पुर्वकर्क रोग, कर्करोग, तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांची तपास्णी करण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आरोग्य शिबीर नियमित वेळेत होणार आहे. तसेच दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी शालेय विद्यार्थ्यांची नाक, कान, घसा तपासणी केली जाणार आहे. हे शिबीर दंत चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिनेश नैताम, नाक, कान घसा शास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. राजश्री खंडारे यांच्या देखरेखीखाली राबविले जाईल. या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी केले आहे.

*बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह सुरु*


अकोला,दि.७ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणारे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बार्शीटाकळी हे शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये दिनांक ६ पासुन सुरू झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. त्या विद्यार्थ्यांनी त्वरीत संपर्क साधावा, असे गृहपाल मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बार्शीटाकळी यांनी कळविले आहे.


*मनपाचे नगरसचिव अनिल बिडवे मराठा भूषण पुरस्‍काराने सन्‍मानीत.* 


 अकोला दि. 07 अकोला महानगरपालिकेच्‍या वेळोवेळी विविध पदाचा कार्यभार पार पाडणारे तसेच नगरसचिव या पदावर कार्यरत असलेले अनिल बिडवे यांचे सामाजिक, शेक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील असलेल्‍या उल्‍लेखनीय कार्याबद्दल त्‍यांना मराठा भूषण- 2021 या पुरस्‍काराने सन्‍मानीत करण्‍यात आले.


          विधान परिषद सदरस्‍य श्री अमोल दादा मिटकरी यांचे शुभहस्‍ते सन्‍मानपत्र, शाल, श्रीफळ व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा देउन रविवार दि. 5 डिसेंबर 2021 रोजी स्‍थानिक मराठा मंडळ, मंगल कार्यालय, रामदास पेठ येथे संपन्‍न झालेल्‍या उपवर वधु व पालक परिचय मेळाव्‍यामध्‍ये मोठ्या उत्‍साहाने पार पडलेल्‍या समारंभात त्‍यांना पुरस्‍कृत करण्‍यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्‍यक्ष श्री मारोतीराव भगत व प्रमुख आमंत्रित असलेले मराठा महासंघाचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष श्री विनायकरावजी पवार, विभागीय अध्‍यक्ष कृष्‍णा अंधारे, कारंजा नगरपरिषदचे माजी अध्‍यक्ष संजय काकडे, कार्यक्रमाचे कार्याध्‍यक्ष मुरली सटाले, अकोला महानगरपालिका नगरसेवक श्री मनोज गायकवाड, अश्विन नवले, रवि शिंदे, सौ.चांदनीताई शिंदे, श्रीमति प्रभावती जाधव, दत्‍तात्रय खताळ, उमेश जाधव, विष्‍णुपंत काशीद, तानाजीराव नेमाने, गोविंदराव मांडवे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सत्‍कार कार्यक्रम संपन्‍न झाला.


          यावेळी महानगरपालिकेच्‍या विविध विभागात अधिकारी पदावर कार्य करीत असतांना श्री बिडवे यांनी कास्‍ट्राईब कर्मचारी संघटनेच्‍या व महानगरपालिका सहकारी कर्मचारी पतसंस्‍थेच्‍या माध्‍यामातून मनपा कर्मचा-यांना वेळोवेळी त्‍यांचे हक्‍क, अधिकार मिळवून देण्‍याकरिता मोठे योगदान देण्‍यासह पतसंस्‍थेची आर्थिक बाजू सुध्‍दा सबळ केली असून त्‍यांचे मराठा समाजाच्‍या उत्‍थानाकरिता मागील 30 वर्षापासूनचे असलेले योगदान व मराठा सेवा मंडळाचे अध्‍यक्ष म्‍हणून त्‍यांची यशस्‍वी कार्यकीद व समाजाप्रति असलेली तळमळ आणि त्‍या दृष्‍टीने विविध कार्यक्रमाच्‍या आयोजनाच्‍या माध्‍यामातून नवयुवकांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळण्‍याकरिता केलेले कार्य या बद्दल त्‍यांना मराठा समाज भुषण पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येत असल्‍याचे आयोजकांव्‍दारे जाहीर करण्‍यात आले. यावेळी श्री अमोल दादा मिटकरी व श्री मारोतीराव भगत व श्री मुरलीधर सटाले यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करून उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले.


          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री मुरलीधर सटाले यांनी तर प्रास्‍तावीक व अभार प्रदर्शन श्री पंडीतराव चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यश्‍स्‍वीतेसाठी नारायणराव गारोळे, महादेवराव तांदळे, चंद्रकांत पन्‍हाळकर, कैलास चव्‍हाण, विश्‍वनाथ शिंदखेळकर, कैलास गाढवे, बाळकृष्‍ण जाधव, सुनिल चव्‍हाण, प्रदीप लुगडे, कैलास खरात, गणेश गिराम, राजेंद्र भगत, ऋषिकेश सटाले, राजु अंधारे, राजेश सटाले, वैभव शेळके यांनी अथक परिश्रम घेतले.






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने