उड्डाणपुलाचे लोकार्पण अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संपूर्ण सहकार्य
-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अकोला,दि.28 - अकोला शहरातील उड्डाणपूलांचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडला. या जाहीर कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजीत पाटील, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. आकाश फुंडकर तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे राजीव अग्रवाल आदी अधिकारी उपस्थित होते.
शहराच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी आपले नेहमीच सहकार्य असते.रस्ते विकास, जलसंधारण, शेती-व्यापार विकास यासर्व प्रश्नांची सोडवणूक करतांनाच अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करु, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अकोलेकरांना दिले.
अकोला जिल्ह्याच्या विकासात अमरावती ते चिखली हा महामार्ग मोठी मोलाची भुमिका बजावणार आहे, असे सांगून त्यांनी या महामार्गालगत ट्रान्सपोर्ट हब तयार करण्यात यावे असे सांगितले. अकोला ही व्यापाराची नगरी आहे. येथे शेती, उद्योग याद्वारे कृषी व ग्रामीण क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यास भरपूर वाव आहे. अमरावती चिखली या महामार्गाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यात असणारा अकोला ते अकोट हा मार्गही लवकरच पूर्ण होईल. अकोला जिल्ह्यातील कापूस हा बांग्ला देशात पाठविण्यासाठी वाहतुक मार्गात बदल केला व तो आता कमी केल्याने नदीजल मार्गाद्वारे ही वाहतुक होईल आणि सूत व कापूस मालवाहतुकीच्या खर्चात बदल झाल्याने कृषी क्षेत्राला भरारी येईल,असेही गडकरी म्हणाले.
अकोला जिल्ह्यात येत्या काळात बार्शी टाकळी ते अकोला येथे रेल्वेमार्गावर पूलास तसेच पूर्णानदीवर काटीपाटी येथील पुलासही मंजूरी देत असल्याची घोषणा यावेळी ना. गडकरी यांनी केली. जिल्ह्यात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी कृषी, उद्योग या सोबतच भविष्यात जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकरी स्वतः इंधन तयार करुन समृद्धीचा मार्ग स्विकारतील व विदर्भ सुजलाम सुफलाम होईल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
==========================================
संशोधन शेताच्या बांधापर्यंत नेण्यासाठी कृषी विद्यापीठांना 50 कोटी रुपये- दादाजी भुसे
अकोला कृषी विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहोचवता यावे यासाठी कृषी विद्यापीठांना दरवर्षी 50 कोटी रुपये विस्तार शिक्षणासाठी देण्यात येतील,असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले. ते म्हणाले की, कृषी विद्यापीठाला अमृत सरोवरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाले आहे,तथापि, हे पाणी वापरता यावे यासाठी राज्यशासन निधी देईल. शेतकऱ्यांनी उत्पादनाकडे लक्ष देतांनाच आपले उत्पादन विक्री करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी ‘विकेल ते पिकेल’ यावर भर दिला आहे.कृषी विद्यापीठांमध्ये मुलींचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे,असेही त्यांनी आवर्जून सांगितले. राज्य शासनाने कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी लक्ष्मी योजना सुरु केली आहे. अमृत सरोवरच्या माध्यमातून कृषी विद्यापीठ तसेच अन्य भागात जलसंधारणाचा लाभ होईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्गचे राजीव अग्रवाल यांनी केले. तसेच कुलगुरु डॉ. भाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी तर कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी आभार मानले.
=======================================
अमृत सरोवर’ पुस्तक प्रकाशन सोहळा शेतकऱ्याने ‘उर्जादाता’ व्हावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अकोला,दि.28- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जलसंधारणाची चळवळ म्हणून देशात ‘अमृत सरोवर’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात झालेल्या कामांची पाहणी व लोकार्पण करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोला जिल्ह्यात आले. यानिमित्ताने येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ.ठाकरे सभागृहात ‘अमृत सरोवर’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
‘अमृत सरोवर’ या योजनेच्या माध्यमातून देशात 75 हजार तलाव, जलाशयांची निर्मिती होऊन जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील तलावांचाही समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना जलसमृद्धी मिळेल. यातून शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिके घेऊन ‘अन्नदाता’ होण्यासोबत पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करुन या देशाचा ‘उर्जादाता’ व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
या कार्यक्रमास राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, कुलगुरु डॉ. विलास भाले, महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरु डॉ.आशिष पातुरकर, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजीत पाटील, आ. अमोल मिटकरी, आ. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. आकाश फुंडकर तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे राजीव अग्रवाल तसेच जिल्हा प्रशासनातील विभाग प्रमुख, शेतकरी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, मला अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीत एका अभियंत्याने विदर्भातील शेतकरी आत्महत्यांबाबत आपण काय उपाययोजना करतात? असा प्रश्न केला. माझ्याकडे समर्पक उत्तर नसल्याने जलसंधारणाच्या कामाची प्रेरणा जागी झाली, आणि शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय करणे,हा अग्रक्रम ठरला. यातून अमृत सरोवर योजनेची संकल्पना आली. ही संकल्पना आधी बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात आली. ती आता अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतीसाठी पाणी नसणे हीच मोठी समस्या असल्याने ती दूर करण्यासाठी अमृत सरोवर योजना महत्त्वाची ठरणार आहे. याच उपक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात 34 शेततळी विकसित करण्यात येत आहेत. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहकार्य आहे. तलाव निर्मितीतून उपलब्ध होणारे मुरुम, माती हे महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येईल, त्या बदल्यात तलावाचे काम विनामूल्य होईल, अशी ही संकल्पना आहे. आज पाहणी केलेल्या ठिकाणी 28 मे या दिवशी पाणी असणे ही मोठी उपलब्धी आहे. यात जुन्या तलावांचा गाळ काढणे, नदी नाल्यांचे खोलीकरण करणे इ. बाबींचाही समावेश करता येणार आहे.
आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री गडकरी पुढे म्हणाले की, शेतकऱ्याला पाण्याची उपलब्धता झाल्यावर या योजनेच्या माध्यमातून विदर्भ सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आहे. कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचवावे. त्यातून शेतकऱ्याने अधिकाधिक समृद्ध व्हावे. अन्नधान्य, तेलबिया उत्पादन घेतांनाच उपलब्ध पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन उत्पादन करुन शेतकऱ्याने केवळ अन्नदाता न होता उर्जादाताही व्हावे, अशी संकल्पना गडकरी यांनी मांडली. या सोबत पशुविज्ञान विद्यापीठानेही आधुनिक तंत्रज्ञान पशुपालकांना उपलब्ध करुन द्यावे व दुग्धोत्पादनातवाढ करावी. कृषी विद्यापीठांमधील संशोधन हे गरजेवर आधारीत असावे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि पाणी व्यवस्थापनातून आपले उत्पादन वाढवावे,असे आवाहनही त्यांनी केले.
===================================
चिखलदरा-नरनाळा-शेगाव महामार्ग व विमानतळाचा प्रश्न मार्गी लावा- बच्चू कडू
अकोला नितीन गडकरी यांचे कामाचे नियोजन अति सूक्ष्म असते. त्यामुळेच एकीकडे महामार्गाचे काम करत असतांना शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावरही त्यांनी भर दिला आहे. खरे तर त्यांना ‘महामार्ग सम्राट’ अशी पदवी द्यायला हवी अशा शब्दात पालकमंत्री बच्चू कडू यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. अकोला जिल्ह्यासाठी मोर्णा नदीचे सौंदर्यीकरण, चिखलदरा- नरनाळा ते शेगाव असा नवा महामार्ग तयार करावा तसेच अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आ. रणधीर सावरकर यांनी जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्या मांडल्या. आ. गोवर्धन शर्मा यांनी ना. गडकरी यांच्या कार्याचे कौतूक आपल्या भाषणातून केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ शर्मा यांनी तर आभार विजय अग्रवाल यांनी मानले.
======================================
महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भव्य शोभयात्रेचे आयोजन - आरोग्य शिबीर , शहरात ठिकठिकाणी होणार प्रतिमपूजन - महाराणा प्रताप सेवा समितीचे आयोजन
अकोला :- येत्या 2 जून गुरुवार रोजी महाराणा प्रताप जयंती निमित्त शहरात शोभयात्रा , आरोग्य शिबीर , प्रतिमा पूजन यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराणा प्रताप सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराणा प्रताप सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे महाराणा प्रताप जयंती निमित्त कुठलीही मिरवणूक अथवा शोभायात्रा काढता आली नाही. आता दोन वर्षांनंतर सर्व निर्बंध उघडल्याने यावर्षी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सर्व प्रथम पुलवामा हल्ल्यातील शाहिद जवान संजयसिंह भिकमसिंह राजपूत यांच्या मातोश्री जिजाबाई भिकमसिंह दीक्षित(राजपूत) यांच्या हस्ते सकाळी महाराणा प्रताप बगीच्यात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करन्यात येणार आहे, तदनंतर भव्यदिव्य रोग निदान शिबीर डॉ. सागरसिंह ठाकूर अस्थीरोग तज्ञ, डॉ. रोशनी सानंदा ठाकूर डेंटल सर्जन यांच्या नेतृत्वाखाली होणार असून या शिबिरात औषध सुद्धा रुग्णांना मोफत देण्यात येणार आहे. सोबतच राजपुतपुरा, अनिकट, कौलखेड येथे प्रतिमा पूजन करून महाराणा प्रताप यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सायंकाळी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून या शोभयात्रेला प्रारंभ महाराणा प्रताप बाग सिटी कोतवाली येथून होणार असून वसंत टॉकीज, पूनम ज्वेलर्स , गांधी चौक ते पुन्हा महाराणा प्रताप बाग येथे समारोप होणार आहे. शोभायात्रेनंतर भोजनाची व्यवस्था सुद्धा केली आहे. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराणा प्रताप सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
=================================
मोरझाडी इथे काँग्रेसची प्रचार बैठक..
बाळापुर (मोरझाडी) हात्रुन जिल्हा परिषद पोट निवडणूक असल्यामुळे सर्व पक्षातील उमेदवार प्रचार प्रसारसभा करीत आहेत आज दिनांक 27 मे रोजी मोरझाडी येथे काँग्रेसची प्रचारदरम्यान बैठक ठेवण्यात आली होती या बैठकीची लोकांची उपस्थिती पाहून कुठेतरी वंचित च्या मतांमध्ये कमी होण्याची शक्यता दिसून येत आहे कारण मोरझाडी हे गाव वंचित बहुजन आघाडी या पक्षाला दरवर्षी पूर्ण शंभर टक्के मतदान करत असते अशातच यामध्ये काँग्रेसचे काहीही वोटिंग नसताना सुद्धा आता या काँग्रेस पक्षाचे चित्र खूप चांगले दिसत आहे हे चित्र पाहून वंचित ला कुठेतरी मतांचा फटका पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे या प्रचार मीटिंगला उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. खतीब साहेब बाळापुर नगर अध्यक्ष काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ मानकर प्रदेश उपाध्यक्ष ब्रह्मदेव इंगळे बाळापूर विधानसभा अध्यक्ष स्वप्निल भाऊ पाठव राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते पंकज भाऊ पाटील गावातील राष्ट्रवादीचे समाधान पाटील गुरुजी सुनील पाटील अनुरथ सरदार सागर भाऊ शेगोकार राजेंद्र पाटील अनिकेत वानखडे रवींद्र पाटील जालिंदर वानखडे शुभम शेगोकार देवराव पाटील निरंजन डोंगरे चंद्रमणी पाटील यशपाल पाटील अमर शेगोकार माजी पोलीस पाटील जीवन पाटील दिनेश गवई कल्पना ताई पाटील लक्ष्मीबाई पाटील पूजाबाई पाटील इंदुबाई पाटील पुनम पाटील सुजाता पाटील बेबीबाई पाटील रत्नाबाई पाटील विद्या बाई गवई शिलाबाई सरदार विद्याबाई सरदार कुसुंबई पाटील प्रभा बाई बाबुळकर ललिताबाई शेगोकार मोरझाडी मधील सर्व युवा कार्यकर्ते व नवीन काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व महिला आघाडी मोरझाडी येथील मोठ्या संख्येने या बैठक केला आनंद बुद्ध विहार मोरझाडी येथे उपस्थित होते काँग्रेस प्रचार सभा मोरझाडी येथे काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्ते व बाबा टायगर सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डी आर पाटील व गावातील सर्व निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली हे बैठक ठेवण्यात आली होती ..
===================================
विद्युत वितरण कंपनीच्या हाय टेन्शन लाईनच्या शॉर्टसर्किटमुळे विधवा महिलेच्या शेतामधील उसाची राखरांगोळी...लाखो चे आर्थिक नुकसान
अकोला स्थानिक रणपिसे नगर, टाले अपार्टमेंट, प्लॉट नंबर 4 अकोला येथील विधवा महिला श्रीमती मंगला मुरलीधर सावके यांचे हिरंगी गावातील तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथील शेत सर्वे नंबर 85 एकूण क्षेत्र ३.५ एकर मध्ये उसाची लागवड केली होती. परंतु विद्युत वितरण कंपनीच्या हाय टेन्शन लाईनच्या शॉर्टसर्किटमुळे या विधवा महिलेच्या शेतातील संपूर्ण उसाची राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे या विधवा महिलेचे लाखो रुपयांचे नुकसान या आगीमुळे झालेले आहे. या संबंधीची तक्रार या महिलेने जिल्हाधिकारी वाशिम ,पोलीस अधीक्षक वाशिम, तहसीलदार, मंगरूळपीर, विद्युत वितरण कंपनी शेलुबाजार मंगरूळपीर तलाठी, पोलीस स्टेशन शेलुबाजार आदी विविध ठिकाणी आपल्याला न्याय मिळावा म्हणून निवेदने सादर केलेली आहे. परंतु निवेदन देऊन पुष्कळ दिवस झाले. तरीही या महिलेला अजूनही न्याय मिळालेला नाही. आधीच पती वारलेला असताना गरीब परिस्थितीत जीवन जगत असलेले या महिलेची आर्थिक कुचंबणा होत आहे. आपल्याला उसाचे येणारे उत्पादन डुबललेच आहे. परंतु पुन्हा त्या शेतामध्ये पेरणी कसी करावी हा प्रश्न आ वासून या महिले समोर उभा आहे. तरी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी ,प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्याने दखल घेऊन त्वरित न्याय देण्याची मागणी विधवा शेतकरी महिला श्रीमती मंगला मुरलीधर सावके यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.






